सर्वसमावेशक पत्रकार विकास समितीची सभासद नोंदणी सुरू,समितीची कार्यकारिणी होणार निश्चित; शनिवारी बैठक
जालना । प्रतिनिधी - जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासाठी नव्याने उभा राहत असलेल्या सर्वसमावेशक पत्रकार विकास समितीच्या सभासद नोंदणीला मंगळवार (दि 29) पासून सुरुवात होत आहे. या समितीची कार्यकारिणीही लवकरच निश्चित होणार असून इच्छुकांनी सभासद नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समितीच्या वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी (दि 2) तिसर्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील पत्रकारांच्या कल्याणासह उज्ज्वल भविष्यासाठी सर्वसमावशेक पत्रकार विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत संपादक ते वृत्तपत्र वितरकापर्यंत प्रत्येक सदस्याच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग निश्चित केला जाणार आहे. समितीची घटना संहिता निश्चित करण्यासाठी आजपर्यंत पत्रकारांच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. शिवाय समितीची प्राथमिक कार्यकारिणीही आगामी काळात ठरविण्यात येणार आहे. या समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांनी पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच वृत्तपत्राच्या प्रत्येक घटकाला समितीचे सदस्यत्व मिळणार आहे. याचाच अर्थ संपादक, पत्रकार, डिटीपी ऑपरेटर, छायाचित्रकार, वितरक आणि वृत्तपत्र कार्यालयाशी निगडीत प्रत्येक व्यक्तीला समितीचे सदस्य होता येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची आणि वरिष्ठांच्या परवानगीची गरज भासणार आहे. समितीमार्फत वृत्तपत्र क्षेत्राशी निगडीत घटकांचे जीवनमान उंचावून प्रत्येकाला न्याय देता यावा यासाठी कार्य उभे केले जात आहे. सदस्य नोंदणी हा समितीचा पहिला टप्पा असून या टप्प्याची मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्याअंतर्गत इच्छुकांनी आवश्यक त्या बाबींची पुर्तता करून नोंदणी करून घ्यावी. विशेष बाब म्हणजे इतर कुठल्याही संघटनेशी संबंधीत व्यक्तीला या समितीचा सभासद होता येणार आहे. समितीसाठी भोकरदन नाका येथील दैनिक जगमित्र कार्यालय येथे संतोष भुतेकर यांच्याकडे नाव नोंदणीसाठी अर्ज उपलब्ध असणार आहे.
या नोंदणीसाठी सभासद वर्गणी ही 101 रुपये निश्चित करण्यात आली असून त्याची पुर्तता देखील संबंधीतांनी करावी असे आवाहन उभा राहात असलेल्या समितीच्यावतीने विजयकुमार सकलेचा, दीपक शेळके, कृष्णा पठाडे, अभयकुमार यादव, मनोज कोलते, अच्युत मोरे, अहेमद नूर, पारसनंद यादव, महेश बुलगे, आयेशा खान मुलानी, गणेश काबरा, महेश जोशी, शदर खानापुरे, शेख चांद पी.जे. सोनाजी झेंडे, संतोष भुतेकर, शेख शकील, मनिष ढिलपे, मधुकर मुळे, सुनील खरात, गजानन वीर, बाबासाहेब शिंदे यांनी केले आहे.