नारियलवाले मारहाण प्रकरणातील पोलीस निलंबित करा -- काकडे
जालना शहरामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांची गुंडगिरी दिनांक 27 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. शिवराज नारियलवाले या भाजपाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लाठ्या-काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेधही व्यक्त केला. भविष्यामध्ये पोलिसांची दादागिरी ही सर्वसामान्य लोकावर दिसून येऊ नये. म्हणून या गोष्टीला आवर घालण्यासाठी पोलिसांची वाढलेली गुंडगिरी थांबवण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन या घटनेतील संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आपण केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी माहिती दिली आहे. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, हि झालेली अमानुष मारहाण व तो बघितलेला व्हिडिओ कोणताही मनुष्य सहन करणार नाही. इतक्या विचित्र पद्धतीने मारहाण करण्याचे आदेश कोणाचे होते? हे सुद्धा तपासणी करणं महत्त्वाच आहे. पोलिसच जर कायदा हातात घेत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा सवालही मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेची पुढील कार्यवाहीसाठी आपण मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री, जालना पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करून शिवराज नारियलवाले यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही. तो पर्यंत आवाज उठवत राहणार असल्याचेही सिद्धेश्वर काकडे यांनी सांगितले आहे.