सतिश खरात यांना "राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार" जाहीर.
मंठा(सूभाष वायाळ)दि.26 मंठा येथील सुप्रसिद्ध नाट्यकलावंत सतिश खरात यांना कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रॉडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "राज्यस्तरीय कलावंत" हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून तो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे , शाहीर अमर शेख, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त नाशिक येथे देण्यात येणार असल्याचे कलावंत मंचचे अध्यक्ष सुनील मोंढे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
मंठा तालुक्यातील लिंबेवडगावसारख्या एका छोट्याशा खेडेगावात राहून नाट्यकलावंत सतिश खरात यांनी पुणे, मुंबई, कोकण मधील दिग्गज कलाकारांसोबत नाट्यरंगभूमीवर ऐतिहासिक पात्राच्या भूमिका वठवल्या आहेत शिवाय नाट्यलेखन, दिग्दर्शन व अभिनयासोबतच अनेक लघुचित्रपटाची निर्मितीही केली आहे.
मध्यमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणभूमीत वाड्या-तांड्यावरील शाळेतून विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे प्रशिक्षण देण्यासाठीही त्यांनी सतत भ्रमंती केली आहे.
या अगोदर त्यांना "आविष्कार गौरव २०२१" या राज्यस्तरीय पुरस्कारानेही गाैरवण्यात आले आहे. सतिश खरात यांची नाट्यक्षेत्रातील एक हरहुन्नरी कलावंत म्हणून त्यांच्या कारकीर्दीची दखल घेऊन "राज्यस्तरीय कलावंत " हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे नातेवाईक व मित्र परिवाराकडून महाराष्ट्रातून कौतुक व अभिनंदन होत आहे.