उद्धव ठाकरेंचा शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील, सोमवारपासून सुरू होणार शाळा========
सोमवार पासून सुरु होणार शाळा
मुंबई आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पसरण्यास सुरूवात झाली. कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिलीये," येत्या 24 जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्री-प्रायमरी ते बारावी शाळा सुरू होतील.
कोरोना संसर्ग पसरल्यापासून राज्य सरकारने पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
त्या पुढे सांगतात, "प्रत्येक भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत." एका महापालिलेने निर्णय घेतला म्हणजे सर्वांनी तो फॉलो करावा असं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पुन्हा शाळा सुरू करताना कायम असतील.
शिक्षणमंत्री पुढे म्हणाल्या, "मुलांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. कोणाचंही शिक्षण थांबू नये ही आमची भूमिका आहे."
बुधवारी शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.
लहान मुलांच्या टास्कफोर्सनेही शाळा सुरू कराव्यात याबाबत हिरवा कंदिल राज्य सरकारला दिला होता.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, "सुरक्षेचे सर्व उपाय करूनच शाळा पुन्हा सुरू केल्या जातील."