जुन्या चालीरीती बंद करून समाजाने नवीन बदल स्विकारावेत – हभप इंदोरीकर महाराज दैठण्यातील गुरु गंगाभारती महाराज संस्थानात संपन्न झाला कीर्तनाचा कार्यक्रम आ. लोणीकरांची उपस्थिती
परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
समाजाने जुनाट झालेल्या समाजविघातक प्रथा, चालीरीती बंद करून नवीन बदल स्विकारावेत. मुलीच्या लग्नाला कर्ज काढून उधळपट्टी करण्यापेक्षा कमी खर्चात लग्न लावा. मुलीच्या लग्नावर खर्च करण्यापेक्षा, तिच्या शिक्षणावर खर्च करा. लग्नातल्या आतष बाजी पेक्षा गावची शाळा अधिक सुविधा संपन्न, डिजिटल कशी होईल याकडे लक्ष द्या असे आवाहन हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले आहे. गुरु गंगाभारती महाराज यांची पुण्यतिथी व माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सायंकाळी परतूर तालुक्यातील दैठणा खुर्द येथील गुरु गंगा भारती महाराज संस्थानात आयोजित कीर्तनात ते बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांच्यातीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जुन्या काळात आपल्या मुलीचे लग्न बापाने किती थाटामाटात केले यावर बापाची पत ठरवली जायची, आता काळ बदलला आहे. असा अमाप आणि निरुपयोगी खर्च करणाऱ्या बापाला आज मुर्खात काढले जाईल. काळाचे पाऊले ओळखून आपण देखील शहाणे झाले पाहीजे. आपला गाव, आपला समाज कसा समृध्द होईल यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे.प्रसंगी झोपडीत रहा पण, मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे पुढे बोलतांना इंदोरीकर म्हणाले.
महाराष्ट्र हा संत, महंतांचा आणि साधू संतांचा वारसा असलेला प्रांत आहे. अशा अध्यात्मिक राज्यात सत्तेवर असणारे आघाडी सरकार देशाची संस्कृती बुडवायला निघाले आहे.किराणा दुकानावर दारू विकण्याचा सरकारने घेतलेला निर्णय, त्याचेच उदाहरण असल्याचे सांगत माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला.
या कार्यक्रमाला परतूरसह दैठणा पंचक्रोशीतील गावकऱ्यांची, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.