प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ निश्चित मिळते -- कपील आकात सेवानिवृत्त कला शिक्षक अमृतराव सवने यांचा सपत्नीक सत्कार
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शिक्षकांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल करावे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. आपल्या विषयाचे सखोल ज्ञान ठेवावे. विज्ञान व कम्प्युटर युगाच्या स्पर्धेच्या टिकून राहावे. येथे तोडजोड करता येत नाही. शिक्षण क्षेत्रात वेळोवेळी होणाऱ्या बदलाची माहिती बाळगावी.
येणारा काळ कठीण आहे. स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत या विद्यालयाचे विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची फळ शेवटी निश्चित मिळते. असे उद्गार मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले.
लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे कलाशिक्षक अमृतराव सवणे हे मंगळवारी (दि.३१ मे) रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवागौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बंडेराव सवणे, विजय राखे, प्रभाकर धुमाळ, अंकुशराव तेलगड, अखिल काजी, शिवाजी सवणे, सिनेअभिनेते योगेश कुलकर्णी, संतोष डव्हारे, सरपंच सोनाजी गाडेकर उपस्थित होते. याप्रसंगी अमृतराव सवणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंदाकिनी सवणे यांचा शाल,श्रीफळ, मानपत्र व महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा देऊन कपिल आकात यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलतांना कपिल आकात म्हणाले की काही माणसे कमी बोलतात मात्र काम जास्त करतात अशा माणसांना आपण मितभाषी म्हणतो. परंतु अशी माणसे देखील यशोशिखर गाठू शकतात. आज सेवानिवृत्त होत असलेले शिक्षक अमृतराव सवणे हे कलाशिक्षक आहेत त्यामुळे त्यांचे कौशल्य बोलण्यात नव्हे तर बोटात आहे. सवणे सरांनी ३४ वर्षे सेवा केली. चित्रकला विषय असल्याने बोलणे कमी व फलकलेखन जास्त असते. त्यांचा स्वभावही मितभाषी आहे. या काळात त्यांनी शिक्षणासह सरपंच,जिल्हा परिषद सदस्य या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा केली आहे. ज्ञानदानाचे कार्य करतांना हातून झालेली सेवा ही पुण्याचे कार्य असते ते कार्य शिक्षकांच्या हातून घडते आणि ते प्रत्येकाने प्रामाणिक करावे असे आवाहन कपिल आकात यांनी केले आहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक वसंतराव सवणे यांनी प्रास्ताविक केले. तर याप्रसंगी माजी पर्यवेक्षक अरुणकुमार बाहेती, काशिनाथ बोनगे यांचीही भाषणे झाली. तर सेवानिवृत्त झालेले कलाशिक्षक अमृतराव सवणे यांनी सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमाला सुभाषराव सवणे, सुरेश सवणे, सुधाकरराव सवणे, बाळासाहेब सवणे, विठ्ठल उगले, प्रल्हादराव सवणे, सुनील तायडे, दत्ता सवणे, दत्ता गाडेकर, बाळासाहेब ताठे, रामेश्वर कचरे, उत्तम सवणे, कैलास मुळे, मुख्याध्यापक भारत भुंबर, उद्धव नवल, बिराजदार,प्रभाकर गुंजकर,सुरुंग, कच्ची, यांच्यासह आजी,माजी शिक्षक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सी.बी.लड्डा यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक शेषराव वायाळ यांनी मानले.
*फोटो ओळी.. कलाशिक्षक अमृतराव सवने हे सेवानिवृत झाल्याबद्दल सपत्नीक सेवागौरव कार्यक्रमात सत्कार करतांना कपिल आकात, बंडेराव सवणे, विजय राखे, प्रभाकर धुमाळ, मुख्याध्यापक वसंतराव सवने, उपमुख्याध्यापक शेषराव वायाळ आदि*