परतूर शहरातील शाळेसमोरील भाजीपाला बिटमुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शहरातील बसस्थानक रोडवरील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयासमोर दररोज सकाळी भरणाऱ्या भाजीपाला बिटमुळे मोठा गोंगाट होत असून विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे बिट इतरत्र हलविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरातील गाव भागात बसस्थानक रस्त्यावर लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालय आहे.शहरासह ग्रामीण भागातील शेकडो मुली या विद्यालयात शिक्षणासाठी बसने ये-जा करतात.बसस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे विद्यालय असल्याने ग्रामीण भागातील मुली या विद्यालयात प्राधान्याने प्रवेश घेतात.परंतु विद्यालयासमोरच दररोज सकाळी भाजीपाल्याच्या ठोक विक्रीचे बिट भरते.बिटामध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी शहरासह आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने येतात तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी लहान-मोठे भाजीपाला विक्रेते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात.भाजीपाला वाहून नेण्यासाठी दुचाकी,सायकलरिक्षा,हातगाडी किंवा इतर वाहनांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात असतो.त्यामुळे एकच गर्दी होते. ही गर्दी शाळेसमोरच होत असल्याने शिक्षकांना ज्ञानदानाचे कार्य करण्यात मोठी अडचण येत आहे. परिणामी शाळेच्या कामकाजात बाधा होत आहे.विद्यार्थिनींचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. बिटातील गोंगाटाचा आवाज थेट वर्गात जात असल्याने विद्यार्थिनी व शिक्षकांना अतोनात त्रासाला सामोरे जावे लागते आहे.विद्यालयापासून हाकेच्या अंतरावर नगरपरिषद कार्यालय आहे हे विशेष.
-----------------------------
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,तहसीलदार रूपा चित्रक व पालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी स्वतः लक्ष घालून शाळेसमोरील बिट इतरत्र हलवावे जेणे करून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, बिट इतरत्र हलविण्याबाबत वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.