युवांनी अंनिसचे सभासद व्हावे-- डॉ. ठकसेन गोराणे
जालना प्रतिनिधी समाधान खरात
जालना -महाराष्ट्र अंनिसच्या जालना जिल्हा व शहर शाखांचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांची बैठक नुकतीच जालना रेल्वे स्टेशन रोडवरील आपुलकी बेघर निवारा केंद्रात संपन्न झाली. त्यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे म्हणाले की, संघटितपणे समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करणे असे काम मागील ३५वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस समाजात करीत आहे. त्याचबरोबर व्यक्तीचे व्यक्तिमत्व विवेकी घडण्यासाठीही या कृतिशील विचारांचा फार मोठा उपयोग होतो, म्हणून या कामांमध्ये युवा वर्गाने जाणिवपूर्वक सहभागी होण्यासाठी अंनिसचे सभासद व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की अंनिसचे सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. देवाधर्माच्या नावाने होणारे शोषण, फसवणूक व दिशाभूल याला अंनिस विरोध करते, म्हणून या विचारांचा स्वतःबरोबरच कुटुंबाला आणि समाजालाही मोठा उपयोग होतो. या बैठकीत संघटनात्मक व उपक्रमात्मक कामाबद्दल चर्चा होऊन नियोजन करण्यात आले. त्यामध्ये सभासद नोंदणी करणे, शाखा निवड प्रक्रिया राबवणे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार मिळवणे , ३१ डिसेंबर रोजी," द दारूचा नव्हे तर द दुधाचा" हा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी राबविण्याचे नियोजन करण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात सर्व दूर पोहोचवणे कामी या संदर्भातील सर्व समाजातील साहित्यिकांच्या लेखन साहित्याचे एकदिवसीय साहित्य संमेलन जालन्यामध्ये आयोजित करण्याबद्दलचा विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज कोरे व जिल्हा अध्यक्ष वैशाली सरदार यांनी मांडला. कार्यकर्त्यांनी त्याला पाठिंबा देऊन, महाराष्ट्रातील मान्यवर लेखकांनाही या साहित्य संमेलनासाठी आमंत्रित करण्याबाबत चर्चा होऊन परिसंवाद, चर्चासत्र आयोजित करण्याचेही नियोजन करण्याचे ठरले.
जिल्हा कार्याध्यक्ष राजू खिल्लारे त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस जिल्हा शाखेचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट राहुल बोबडे, बुवाबाजी विरुद्ध संघर्ष सचिव रंगनाथ थोरात,शेख मेहजबिन (पत्रकार),विनोद काळे, (पत्रकार),समाधान खरात(पत्रकार),समीर शेख,मोहमद रफिक शेख,प्रा सचिन निसर्गन, भरत चौधरी, आपुलकी चे संचालक अरुण सरदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .