शिक्षण महर्षी बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार वाबळेवाडीच्या वारे गुरुजींना जाहीर, ८ मार्च रोजी वितरण
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या वतीने दिला जाणारा शिक्षण महर्षी स्व.बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार यंदा जि.प.आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडीचे तत्कालीन मुख्याध्यापक तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्व .बाबासाहेब भाऊ आकात
दत्तात्रय वारे गुरुजी
दत्तात्रय वारे गुरुजी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावाचा कायापालट करून गावाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना पहिला पुरस्कार देण्यात आला आहे. दुसऱ्या पुरस्कारासाठी वारे गुरुजींची निवड पुरस्कार निवड समितीने केली आहे.
येत्या ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता परतूर येथील स्व.बाबासाहेब आकात सभागृह, लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते सदरील पुरस्कार वारे गुरुजींना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे, पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. कुणाल आकात यांची उपस्थिती असणार आहे.
वाबळेवाडी शाळेला आतंरराष्ट्रीय शाळा बनविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी घेतलेली मेहनत, लोकांचा सहभाग या बाबत वारे गुरुजी आपले अनुभव कथन या कार्यक्रमात करणार आहेत.
याच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकलचे वितरण करण्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
परतूर आणि परिसरातील नागरिकांनी पुरस्कार वितरण सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी केले.