पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावा-गावातून स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला- पालकमंत्री अतुल सावे


 
  जालना प्रतिनिधी नरेश अन्ना
 दि. 17 सष्टेबर  मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या बंधनातून मुक्त करुन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारण्यात आला होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा मराठवाड्याच्या गावा-गावातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
         मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल‍ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना मंत्री श्री. सावे म्हणाले की, देशाला 15 ऑगस्ट, 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देशातील 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. परंतु हैदराबाद, काश्मिर आणि जुनागढ ही तीन संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. त्यामुळे मराठवाड्यातील जनता ही निजाम संस्थानाच्या जूलमी राजवटीखालीच होती. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. निजाम शरण येत नाही. तसेच रझाकारांचे नागरिकांवर अत्याचार वाढत असल्याचे पाहून, भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस ॲक्शन सुरु केली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जूलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त होवून भारतीय संघ राज्यात विलीन झाला. आणि या लढ्यामुळेच भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालनाकरांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्या महाराष्ट्र परिषदेचे महत्वाचे योगदान आहे. त्याची सुरुवात जालना जिल्ह्यातील परतूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून झाली होती. तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोलते पिंपळगावकरांचे मोठे योगदान आहे. असेही त्यांनी सांगितले.
मुक्तीसंग्रामासाठी जालना जिल्ह्यातील जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देवून हा लढा यशस्वी केला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मराठवाड्याची झाशीची राणी दगडाबाई शेळके, जनार्दन मामा अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढाकारातून मुक्तीसंग्रामाचा हा सशस्त्र लढा लढला गेला होता. मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात अनेक महिला स्वातंत्र्य सैनिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते. या सर्व थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या महान कार्याची आठवण व त्यांना श्रध्दांजली देण्याकरीता येथील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमधील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय परिसरात मुक्तीसंग्रामाचा इतिहास व वारसा सांगणारे भित्तिचित्र तयार करण्यात आले आहे. यामुळे आजच्या पिढीला आपल्या मुक्तीसंग्रामचा महान इतिहास समजण्यास मदत होणार आहे. असेही पालकमंत्री श्री.सावे यांनी सांगितले.
प्रारंभी टाऊन हॉल परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या वारसांची श्री. सावे यांनी भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केला.

*महसूल विभागाला नवीन तीन वाहनाचे लोकार्पण

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभाग अधिनस्त क्षेत्रीयस्तरावर गतीमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेतंर्गत जुन्या तीन निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन देण्यात आली. यामध्ये महिंद्रा बोलेरो निओ वाहन तहसीलदार परतुर व जालना तसेच उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना हस्तांतरित करण्यात आले. या वाहनाचे लोकार्पण  पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अर्जून खोतकर, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत  हदगल, यांची प्रमुख उपस्थिती होती

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात